Saturday, 25 July 2020

नागपंचमी लहानपणीची आणि आताची...

 *" नागपंचमी लहानपणीची आणि आताची.."*

माणसाच्या मनात, प्रत्येक, सणाच्या, विशिष्ट घटनांच्या, व्यक्तींच्या, वास्तूच्या  खुप आठवणी दडलेल्या असतात. त्यात्या प्रसंगी त्या आठवणी जशाच्या तशा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. माझ्या बाबतीत असे अनेक वेळा होतं आणि मग मन एकदम लहान होऊन जातं.

आज नागपंचमी, असच सकाळी स्वयंपाक करताना मन लहानपणीच्या आठवणी मध्ये गेलं आणि सगळं जसच्या तसं आठवलं. नागपंचमी म्हटली की हातावरची लालचुटुक रंगलेली मेहेंदी आणि तिचा हाताला येणारा उत्कट सुवास, हातातल्या नवीन बांगड्या, छान जरीचा फ्रॉक नाहीतर परकर पोलका, आमच्या घरी मागच्या दाराला नानांनी, माझ्या आजोबांनी बांधुन दिलेला झोका आणि आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंड. परंपरे प्रमाणे केलेला सगळा स्वयंपाक, चिरणे, तवा कढई वर्ज्य असल्यामुळे कोणत्याही शेंगांची भाजी, दह्यात कालवलेली दाण्याची चटणी, किंवा मेतकुट, आणि आळू किवा पालकांच्या वाफवलेल्या वड्या.. बास एवढंच असायचं पण त्या जेवणाला वेगळीच चव असायची.

लहानपणापासूनच मला मेहेंदी खुप आवडते. वेगवेगळ्या प्रकारच्या मेहेंदीचा सोहळा मला मनापासुन आवडीचा. मेहंदीच्या हिरव्या पानांना वाटुन मेहेंदी लावण्यापासून ते आज आयता कोन घेऊन मेहेंदी काढण्या पर्यंत सगळे सोहळे मनाच्या आनंदासाठी. अगदी लहानपणी आठवतं, आई रात्री मेहेंदी लावायची त्यात हातावर चार गोळे आणि त्याच्या भोवती काडी ने बारीक ठिपके. नाहीतर सरळ एका हाताला चोपडा, म्हणजे पूर्ण हातभर नुसती मेहेंदी आणि ही मेहेंदी रात्री अंथरुणाला लागु नये म्हणून आई तिच्या साडीच्या कपड्याने हात हलका गुंडाळुन ठेवायच्या. सकाळी उठल्यावर उत्सुकता एकच, कोणाची मेहेंदी जास्त रंगली. मेहंदी धुण्याआधी आई हाताला खोबऱ्याच तेल लावून द्यायची आणि मग ती धुतल्यावर दिवसभर त्या रंगलेल्या हाताकडे बघत आणि त्याचा मनभरून अनेकदा वास घेत असे. जसं जशी मोठी झाले तशी बारीक कोनाच्या मेहेंदीचे वेड लागलं, मग त्यासाठीचे सगळे सोपस्कार शिकले आणि दरवेळी अजुनच छान मेहेंदी काढायला लागले.

त्यानंतर आवडीचा म्हणजे मागच्या दरात बांधलेला झोका, तसा छोटा होता पण फळीवराचा तो झोका मला खुप आवडायचा, नागपंचमीच्या २/३ दिवस आधीपासून झोका बांधण्यासाठी आम्ही बहिणी हट्ट करायचो आणि बांधल्यावर आळीपाळीने १०/१५ झोके असे मोजुन खेळायचो. हा झोका दाराला बांधलेला होता, खेळताना तो आर्धा घरात आणि अर्धा बाहेर यायचा त्याची मला खुप मजा वाटायची. त्यावरची फळी टोचू नये म्हणुन आई त्यावर मऊ चादर घालुन द्यायची. काही वर्षांनी तो झोका बंद झाला पण कितीतरी वर्ष घराच्या माळ्यावर झोक्याची फळी होती, माळा आवरताना नेहमी ती फळी झोक्याची आठवण करुन द्यायची.

नागपंचमीच्या दिवशी हमखास आमच्या घरी नागोबाला घेऊन गारुडी यायचा.. पुंगी वाजवत नागोबाला डोलवायचा त्याला बघायला खुप मजा वाटायची. त्यादिवशी आई देवासमोर पाटावर गव्हाच्या पीठानी नागाची रांगोळी काढून पुजा करायची, त्याला ज्वारीच्या लाह्या आणि दुध साखरेचा नैवेद्य दाखवायची.. मला सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे.. संध्याकाळी आम्हा मुलींबरोबर आईनी वाचलेली नागपंचमीची कहाणी.. मन लाऊन ती ऐकायची, त्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं. परत रात्री झोपताना हाताच्या रंगलेल्या मेहेंदीकडे डोळेभरून पाहून झोपत असे.

आजची नागपंचमी स्वतःपेक्षा, मुलींसाठी जास्त असते. त्यांना मेहेंदी लाऊन द्यायची, त्यांच्यासाठी पुरणाचे दींड करायचे, नवीन बांगड्या आणि आज ट्रॅडिशनल घाला, असा आग्रह करत साजरी करायची. लहानपणी झोका घरात बांधायचे. पण आता फ्लॅट मध्ये ते शक्य नाही. नागपंचमी आता फक्त मुलींसाठी साजरी करतेय असं वाटतं आणि त्यात आनंदही आहे..

तरीही लहानपणीची रंगलेल्या हातातल्या मेहेंदी ची आणि झोक्याची नागपंचमी अजुनही मनात तशीच दरवळतेय...!!!


- अश्विनी जोशी.

5 comments:

  1. Masta!! Athawanincha calidoscope 😀😍

    ReplyDelete
  2. Chan lihila aahe Ashwini👍🏻👍🏻😊😊
    I am sure Sharu ani Sawu pan ha san titkach enjoy karat astil.

    ReplyDelete
  3. Khup chan lihila ahes ga! Mastach. Kharach lahan panichya saglya aathvani asha lakkha dolya pudhe ubhya rahilya 😊👍

    ReplyDelete
  4. Khup chan lihilys g. Vachtana dolysamor aal sagal👌🏻👍🏻

    ReplyDelete
  5. Khup chan lihilys g. Vachtana dolysamor aal sagal👍🏻👌🏻

    ReplyDelete