पं. पन्नालाल घोष स्मृती अभिवादन.
भारतीय संगीतातील विविध वाद्यांमधील सर्वात प्राचीन वाद्य म्हणजे, वीणा, मृदंग आणि बासरी.
त्यामधील भगवान श्री. कृष्णाने लोकप्रिय केलेले वाद्य म्हणजे बासरी, वेणु, बंसी अशा नावाने ओळखले जाणारे वाद्य, त्याच्या मधुर ध्वनीमुळे अधिक लोकप्रिय आहे. भारतीय संगीतात या वाद्याचा समावेश लोकगीत, चित्रपट गीत, ते शास्त्रीय संगीतात आढळतो. विविध गीतप्रकारांमध्ये बासरी या वाद्याचे वेगळे स्थान आहे.
कोणतेही वाद्य जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्यात अनेक कलाकारांचा, त्यांच्या वादनशैलीचा महत्त्वाचा वाटा असतो. उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतात स्वतंत्र वादनात बासरी या वाद्याला मानाचे स्थान मिळवुन देण्याचे श्रेय पंडित पन्नालाल घोष यांना दिले जाते.
अनावधानाने हातात आलेले बासरी हे वाद्य त्यांनी अतिशय प्रेमाने आत्मसात केले आणि गायकी अंगाने बासरीच्या स्वतंत्र वादनास सुरुवात केली. ख्याल गायनातील सर्व आलंकरणाचा हुबेहुब उपयोग पं. घोष यांनी त्यांच्या वादनशैलीमध्ये आणला, आणि शास्त्रीय संगीतामध्ये बासरी या वाद्याची वेगळी ओळख करून दिली.
स्वतः शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेऊन त्यातील बारकाव्यांचा उपयोग, गायकी अंग शैलीतून बासरी वादनात केला. मानवी गळ्याच्या अगदी जवळ जाणारे बासरी हे वाद्य गायकी अंगाने वाजवुन, त्यातील माधुर्य अधिक वाढवले.
कलाकाराचा मुळ स्वभाव त्याच्या कला सादरीकरणात परावर्तीत होत असतो असे म्हणतात. पं. पन्नालाल घोष यांच्या संवेदनशील स्वभावामुळे त्यांचे बासरी वादन मनाला जाऊन भिडणारे होते. ते स्वतः गायक, बासरी वादक आणि संगीतकार होते. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतात स्वतंत्र वादन केले नाही तर त्याकाळातील विविध चित्रपट गीता मध्ये बासरी वादन केले आहे. त्यांनी अनेक बंगाली गीतांमध्ये ही बासरी वादनाने संगत केली आहे. संगीताची मनापासुन असलेली आस, त्यांची चिकाटी आणि स्वभावातली संवेदनशीलता या मुळे त्यांच्या बासरी वादनात वेगळ्या प्रकारची आर्तता होती.
त्यांच्या स्वतंत्र वादनातील मारवा, यमन, देस अशा रागांमधून त्यांच्या वादनातील आर्ततेचा प्रत्यय येतो.
आपल्या अल्पायुष्यात त्यांनी संगीतासाठी खुप मोठे काम केले. आज अभिजात संगीतामध्ये स्वतंत्र बासरी वादन आनंदाने ऐकताना, आशा थोर व्यक्तींची आठवण ठेवणे क्रम पात्र ठरते.
आज त्यांची जयंती (काहीं ठिकाणीं 24 जुलै असा उल्लेख) , त्या निमित्ताने त्यांच्या थोरवीची आठवण आपण काढावी आणि त्यांनी केलेल्या महान कार्यासाठी मनात कृतज्ञता व्यक्त करावी.
- अश्विनी जोशी.